कर्करोगाचे वेळेवर निदान करणारी केंद्रे
देशातील कर्करोग रुग्णांची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमावर(एनसीआरपी) आधारित असते. 2012-16 या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे तयार केलेल्या एनसीआरपीचा 2020 चा ताजा अहवाल आहे यापूर्वीचा अहवाल 2016 चा होता जो 2012-14 या काळातील आकडेवारीवर आधारित होता. तसेच 2020 या वर्षाचा अहवाल जास्त लोकसंख्या आधारित कर्करोग नोंदणीवर( पीबीसीआर) असल्याने त्याची व्याप्ती जास्त आहे. वरील बदलांच्या परिणामस्वरूप देशातील कर्करुग्णांच्या वार्षिक आकडेवारीचा 2020 चा अंदाज 2016 च्या एनसीआरपीच्या पूर्वीच्या अहवालाच्या तुलनेत सुधारित आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये हा राज्याचा विषय आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारकडून कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आणि परवडण्याजोगे आणि उपलब्ध असणारे उपचार पुरवण्यासाठी राज्यांच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवले जाते. सरकार पायाभूत सुविधांची बळकटी, मनुष्यबळ विकास, आरोग्य जागरुकता, वेळेवर निदान, व्यवस्थापन आणि योग्य वैदयकीय सल्ला यावर भर देत राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाची( एनपीसीडीसीएस) अंमलबजावणी करत आहे. एनपीसीडीसीएस अंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मुख, स्तन आणि सर्वायकल कर्करोग या कर्करोगाच्या नेहमी आढळणाऱ्या प्रकारांच्या( सामान्य एनसीडीच्या) नियंत्रण, प्रतिबंध आणि निदानासाठी लक्षद्वीपसह संपूर्ण देशभरात लोकसंख्येच्या पातळीवर उपक्रम राबवत आहे. लक्षद्वीप सरकारला कर्करोगाचे वेळेवर निदान करण्यासहित लोकसंख्या आधारित तपासणीसाठी पीआयपी अर्थात कार्यक्रम अंमलबजावणी योजनेच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरवले जात आहे. या उपक्रमांतर्गत 30 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची असंसर्गजन्य आजारांसाठी हेल्थ आणि वेलनेस केंद्रातील/ प्राथमिक आरोग्य केंद्रातील/ उप केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले जाते. नेहमी आढळणारे मुख, स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रकारांची तपासणी हा देखील या उपक्रमाचा एकात्मिक भाग आहे. आयुष्मान भारत- आरोग्य आणि वेलनेस केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाते. लोकसंख्या आधारित तपासणीमुळे नेहमीच्या कर्करोगासहित या एनसीडीचे धोके आणि त्यांचे वेळेवर निदान याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करता येते. लक्षद्वीपमधील कल्पेनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, किलतान येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,चेलताह येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे रुपांतर आरोग्य आणि वेलनेस केंद्र आणि कर्करोग तपासणी केंद्रांमध्ये केल्याची माहिती लक्षद्वीपच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने दिली आहे. स्तन, मुख आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान करण्यासाठी आम्नी बेटावर पात्र लोकसंख्येसाठी शिबिरांचे आयोजन केल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.
कर्करोगासहित सामान्य असंसर्गजन्य आजारांसाठी संबंधित धोके आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार याबाबत जागरुकता मोहिमा राबवल्या जात आहेत. वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे यांच्या माध्यमातून जागरुकता निर्माण केली जात आहे. आयसीएमआर- एनआयसीपीआर, नॉयडा यांनी इंडिया अगेन्स्ट कॅन्सर या संकल्पनेसह www.cancerindia.org हे पोर्टल सुरू केले आहे. भारतातील प्रमुख कर्करोगाविषयी त्यावर माहिती दिली जात असून जागरुकता, प्रतिबंध आणि उपचार यावर भर दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
0 टिप्पण्या