मानवी भूगोल :
व्याख्या व व्याप्ती सर्व मानवजात एकच असली तरी जगातील नाना देशांत नाना प्रकारचे लोक राहतात. त्यांचा आहार, विहार, निवारा, वस्त्रप्रावरण या गोष्टी भिन्न असतात. या सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी ते विविध प्रकारचे व्यवसाय करतात. मुंबईतील मलबारहिलसारख्या भागातील लोक गगनचुंबी इमारतीत राहातात, हॉकी क्रिकेट, चित्रपट इत्यादींनी आपली करमणूक करतात, तर मुंबईपासून 120 कि.मी. अंतरावरील डहाणू, बोर्डीसारख्या खेड्यांतील आदिवासी शाकारलेल्या झोपड्यांत राहातत व तारपे( एक वाद्य) वाजवून आपली करमणूक करतात. त्याचप्रमाणे एखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापकाचे जीवन हे भटकळ पशुपालकापेक्षा वेगळे असते. हा फार जैविक आहे. लोकांना तो जन्मतः प्राप्त होतो. थोडक्यात, पर्यावरणाच्या भिन्नतेमुळे अशाच प्रकारची विसंगती अनेक ठिकाणी आढळून येते. उदा, कोकणात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर रीतीने सफरचंदाच्या वाड्या करता येणार नाहीत. पुण्या-मुंबईच्या लोकांचा रेल्वे किंवा बसस्थानकानजीक अगर मध्यवर्ती बाजारपेठे- नजीक राहण्याची जागा पसंत करण्याकडे कल राहील तर राशीनसारख्या(नगर जिल्हा) गावी अक्षय पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणीच कायमची वस्ती केली जाईल. अशी विविधता आणि तिची कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात करतात. व्याख्या मानवी भूगोलाची व्याख्या तयार करताना त्यातील विविध दृष्टिकोण लक्षात घेतले पाहिजेत. या विषयाच्या अभ्यासकांनी जसे हे विविध दृष्टिकोण विकसित केले तसा या विषयाचा आशय व व्याख्या बदलत गेली. या विविध व्याख्या समजून घेताना एक मध्यवर्ती कल्पना निश्चितपणे सांगता येईल. `मानव व निसर्गसंबंधांचा मानवी विकसनाच्या दृष्टिकोणातून केलेला अभ्यास म्हणजे मानवी भूविज्ञान.' ही ती कल्पना होय. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढे दिलेल्या आहेत : रॅटझेल : "मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय." रॅटझेल हे जर्मन भूवैज्ञानिक मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून पर्यावरणाच्या परिणामांची गुंतागुंत समजून घेण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली, कु. सेंपल : "अविश्रांत मानव व अस्थायी पृथ्वीवरील बदलत्या पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल." कु. सेंपल या रॅटझेल यांच्या शिष्या. पृथ्वी आणि मानव या दोघांचा परामर्श मानवी भूगोलात घेणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले. हंटिंग्टन यांच्या मते "भौगोलिक पर्यावरण व मानवी व्यवसायगुण यांचे स्वरूप व परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल." हंटिंग्टन यांच्या मते मानवी भूगोलाच्या अभ्यासात नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांना खूपच महत्त्व आहे. भू-रूप, समुद्रापासूनचे अंतर, जमिनी, हवामान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीचे घटक मानवाच्या आर्थिक जीवनावर व मानवी संस्कृतीच्या दर्जावर आपले नियंत्रण ठेवतात. विविध भागांत नैसर्गिक परिस्थिती भिन्न असल्याने तेथे राहाणाऱ्या मानव समाजांना सारख्याच प्रकारचे यश आर्थिक विकासात येत नाही. डेव्हिस यांच्या मते, मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण व मानवाची भौतिक प्रगती यांमधील कार्यकारणभावाचे संशोधन होय. प्राध्यापक इभ्रे जोन्स यांनी पुढीलप्रमाणे मानवी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. : "मानवी जीवनाच्या बहुविध अंगांपैकी जी अंगे सतत बदलणाऱ्या मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधामुळे एखाद्या प्रदेशात एक विशिष्ट प्रकारचे चित्र निर्माण करतात, त्यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. " कॉक्स यांच्या मते, "भूपृष्ठावरील मानवनिर्मित स्थिर व अस्थिर घटनांच्या स्थानिक आकृतिबंधनाचे वर्णन व विश्लेषण म्हणजे मानवी भूगोल." या सर्व व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून येईल की, 1) मानव हा नैसर्गिक पर्यावरणाचा आविष्कार आहे. 2) मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून मानवी हिताच्या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे.( हे विदाल द ला ब्लाश यांनी पटवून दिलेले होते.) 3) मानवी कार्यासही महत्त्व असल्याने व सभोवताच्या परिस्थितीत मानवी कर्तृत्वाचे परिणाम दिसून येत असल्याने त्याचाही अभ्यास मानवी भूगोलात करणे आवश्यक आहे. हे डेमान जिऑन यांचे म्हणणे पटते. 4.) व्हाईट व रेनर यांच्या मते, मानवी भूगोल म्हणजे परिस्थितीविज्ञान. विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीशी एकरूप होत असलेल्या मानव-समूहांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. 5) डिकन्स व पिटस यांच्या मते मानव आणि त्याचे कार्य यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल. 6) लेबॉन यांच्या मते मानवी भूगोल म्हणजे साकलीय भूगोल. 7) जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली मानवी प्रगती म्हणजे स्थानिक नैसर्गिक परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची प्रक्रिया होय, असे जीन्स ब्रून्स म्हणतात. मानवी संस्कृतीचा विकास व ऱ्हास या मानवी घटना किंवा क्रिया- प्रक्रिया क्रियाप्रक्रिया स्थलकालरूप असतात, कारण निश्चित अशा ठिकाणी त्या वेगवेगळ्या काळी घडलेल्या असतात, त्यामुळे स्थळाच्या प्राकृतिक व सांस्कृतिक वैशिष्ट्याचे मानवी विकासावर झालेले परिणाम मानवी भूगोलात अभ्यासले जातात. अशा अभ्यासात पर्यावरणाच्या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम पाहाणे हा प्रमुख उद्देश असतो. त्यालाच स्थलीय एकता( Terrestrial unity) असे म्हणतात. मानवी भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता प्रचंड वेगाने होणाऱ्या पृथ्वीच्या `मानवीकरणा' मुळे पर्यावरणाच्या म्हणजे परिसराच्या संरक्षणाची गरज जगात वाढत आहे. मानवाच्या विविध आकृतिबंध पर्यावरणाची कळत-नकळत हानी करीत असतात. मानवाच्या विविध क्रियाप्रकिया सुरू असताना त्याच्या परिसराच्या संरक्षणाचे स्मरण त्याला करून देणे, त्याबद्दल जागृती निर्माण करणे हे मानवी भूगोलतज्ज्ञांचे अंतराळयुगातील महत्त्वाचे कर्तव्य आहे. अनेक प्राचीन संस्कृतींनी आपल्या परिसराचा नाश केला. चुकीच्या पद्धतीने शेती केल्याने जमिनींचा कस व पाणीपुरवठा यांचे नुकसान झाले. अशा प्रकारचे दुरूपयोग किंवा अतिरिक्त उपयोग टाळण्यासाठी मानवी भूगोलातील संशोधनाचे निष्कर्ष सामान्य जनतेपर्यत नेणे हेदेखील आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भूपृष्ठाचा दुरूपयोग केल्यामुळे निर्माण झालेले परिसरविषयक दोष टाळणे, सुधारणे व निसर्ग- व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे यासाठीही मानव, निसर्ग-सहजीवनाचा अभ्यास व संशोधन यांची आवश्यकता आहे. तंत्रविज्ञानावर भर असणाऱ्या समाजात निरूपयोगी घन पदार्थाचे साठे जमतात. त्यांचा दुरूपयोग करणयाचे तंत्र अजून अवगत नाही. अनेक औद्योगिक देशांत घन अवशेषांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विकसनशील देशांतही मुंबई-कलकत्त्यासारख्या शहरांत त्याने उग्ररूप धारणे केलेले आहे. आपण पूर्वीपेक्षा अधिक अवशेष तयार करतो, त्यांपैकी बरेच नैसर्गिक परिस्थितीरचनात न आढळणारे असे रासायनिक घडणीचे असतात. उत्क्रांतीच्या इतिहासात अशी पूर्वीची उदाहरणे नव्हती. त्यामुळे त्यांच्याशी कसा मुकाबला करायचा हे निसर्गाला ठाऊक नाही. त्यासाठी नवीन तंत्रपद्धती हव्यात व स्थलकालपरत्वे त्यांचा विविध घटकांशी असलेला संबंध अभ्यासणे आवश्यक आहे. हे कार्य मानवी भूगोलात केले जाते. निसर्ग-संरक्षण ही एक नवी चळवळ निर्माण झालेली आहे. ती एक काळाची गरज श्रीमंत व गरीब अशा दोन्ही देशांत आहे. भारतासारख्या अर्धविकसित देशात दारिद्र्य व प्रदूषण अशा दोन्बी बाजूंनी पर्यावरणाची किंवा स्थानिक परिसराची अवनती होते. तिचा अभ्यास करून हानीचे प्रमाण कमी करण्यासाठीही मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती कोणतीही असो, आपण जीवन कसे जगतो, आपल्या स्थानिक परिसराच्या बाबत आपली कर्तव्ये आपण पार पाडतो की नाही हे समजणे आवश्यक आहे. आपल्या भोवतालच्या सृष्टीशी आपण असा चैतन्यपूर्ण व अभिनव समतोल साधला पाहिजे. आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वागणुकीची पर्यावरणाच्या संदर्भात खोलवर तपासणी केली पाहिजे. अमेरिकन माणसाने मोटारगाडी व प्लॅस्टिक यांवरचे आपले प्रेम कमी करणे आवश्यक आहे. तर भारतीयांनी गाईची अतिरिक्त पैदास व तिचे वाजवीपेक्षा जास्त धार्मिक, भावनिक लाड करणे व झाडांचा जळण म्हणून बेसुमार उपयोग करणे या गोष्टी हळूहळू कमी करायला हरकत नाही. आपल्या देशात ग्रामीण भागांची पुनर्रचना सुरू आहे. परंतु परिसराबद्दल जर आपण विधायक व मिशनरी वृत्ती ठेवली तरच आपल्या ग्रामीण भागांचा उद्धार होईल. निसर्गसंरक्षणात लोकांची संस्कृती व चालीरीती यांचाही अंतर्भाव हवा. कारण आपले हे आकर्षक करण्यात त्यांचाही वाटा आहे. तांत्रिक प्रगतीमुळे व प्रचंड औद्योगीकरणामुळे प्राचीन काळापासून मानवसमूहांनी जोपासलेली अनेक कौशल्ये व कला यांचा ऱ्हास होत आहे, कारण त्यांना बाजारात मागणी नाही. त्याच- प्रमाणे अनेक पारंपारिक रीतींनाही आपण मुकत आहोत. कारण त्यांचे मोल आपण शास्त्रीय दृष्टीने कधीच तपासून पाहिलेले नाही. म्हैसूरपरमधील उपलिग व कुर्शबा जमाती व जुन्या काळची पक्कीन जमात जनावरांच्या खुरावरून त्यांचा जंगलात मागोवा काढण्यात पटाईत होती. आजच्या निसर्गाभ्यासकांना त्यासाठी यंत्रांची मदत घ्यावी लागते. यंत्रविज्ञानातील प्रगतीमुळे माणसाच्या इंद्रियांची संवेदनाशक्ती क्षीण झाली तर संपूर्ण मानवजातीची त्यामुळे हानीच होणार आहे. अनेक पारंपारिक कौशल्यांचा त्यांच्या परिसराच्या संदर्भात अभ्यास करणे हे मानवी भूगोलतज्ञांचे कर्तव्य आहे. या अभ्यासाचे उद्दिष्ट आपल्या भूतकाळाची महती गाणे हे नाही. जुन्या चालीरीतींची शास्त्रीय चिकित्सा करून त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे परीक्षण करणे हे आहे. त्यातूनच बदलत्या काळानुसार या संबंधांत कशा प्रकारे बदल करता येईल याचे ज्ञान होते. ग्रामीण भागांचा विकास करताना शहरातील विकासाचे अंधानुकरण टाळणे आवश्यक आहे. विकासाची दिशा ठरविताना ग्रामीण भागांतील उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विचार करून त्यांचा विनियोग कशा प्रकारे करता येईल हे अभ्यासणे जरूरीचे आहे, यामुळेच तेथील निसर्ग वा परिसर सुरक्षित राखणे सोपे जाईल. या अभ्यासाचे उद्दिष्ट आपल्या भूतकाळाची महती गाण्याचे नसून, जुन्या चालीरीतींची शास्त्रीय चिकित्सा करून त्यांचे तत्कालीन पर्यावरणसंबंधांचे परीक्षण करणे हे आहे. त्यातूनच बदलत्या काळानुसार या संबंधात कशा प्रकारे बदल करता येईल याचे ज्ञान होऊ शकेल. मानवी क्रिया-प्रक्रिया चालू असताना निसर्ग-मानव संबंध बदलत जातात. जलचक्र, नत्रचक्र इत्यादी निसर्ग-नियमांच्या विरूद्ध दिशेने मानवी क्रिया चालू असतात. त्यामुळे त्या निसर्गचक्रांत अडथळे येतात, यालाच प्रदूषण असे म्बणतात. प्रदूषणामुळे एकेकाळी अनुकूल असलेला निसर्ग प्रतिकूल बनू शकतो. तेव्हा असे प्रदूषण टाळून, निसर्गसंवर्धन करून मावनी विकास कसा साधता येईल याचा विचार करणे हे मानवी भूगोलाचे महत्त्वाचे अंग आहे. विविध वाद:- मानवी भूगोलाचा अभ्यास विकसित होत असताना त्यात अनेक दृष्टिकोण व वाद यांची भर पडत गेली. या विषयाचा अर्थपूर्ण अभ्यास करण्यासाठी हे विविध वाद, त्यांचे विविध शास्त्रज्ञांनी सांगितलेले दृष्टिकोण आणि त्यांतील संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. मानवी भूगोलाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने आधुनिक काळाच्या सुरूवातीपासूनच मानव-निसर्ग संबंधांच्या संदर्भात दोन प्रश्न महत्त्वाचे ठरले. 1) मानवी विकास सर्वस्वी नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे का ? 2) मानवी विकास घडविण्यामध्ये मानवी कार्याचे महत्त्व आहे का ? या दोन्ही प्रश्नांची होकारार्थी उत्तरे दोन वेगवेगळ्या गटांतील शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत. त्यातून निसर्गवाद व संभववाद या दोन प्रमुख विचारप्रणाली मानवी भूगोलामध्ये रूढ झाल्या. त्यांचा सविस्तर विचार आपण आता करू. निसर्गवाद : मानवी विकास सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून असतो असे मानणारी ही विचारसरणी होय यामध्ये मानवी विकासावर नैसर्गिक पर्यावरणाचा केवळ परिणामच होतो असे न मानता मानवी विकसनामध्ये कार्यरत असलेल्या `मानवा'ची इच्छा व स्फूर्तीसुद्धा निसर्गावर अवलंबून असते असे मानले जाते. अगदी टोकाची भूमिका म्हणजे मानव हा निसर्गाचाच अविभाज्य भाग असून इतर प्राणिमात्रांप्रमाणेच त्याच्या सर्व हालचाली नैसर्गिक घटकांनुसार होत असतात ही होय. याच विचारांना निसर्गावाद असे म्हणतात. ही विचारसरणी 19 व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात प्रचलित झाली. त्या काळात सभोवतालची परिस्थिती म्हणजे केवळ नैसर्गिक पर्यावरण असेच समीकरण मानले जात होते. म्हणूनच निसर्गवादास पर्यावरणवाद (Environmentalism) असेही संबोधले गेलेले आहे. निसर्गवाद किंवा पर्यावरणवाद खऱ्या अर्थाने 19 व्या शतकामध्ये सांगण्यात आलेला असला तरी या प्रकारचा दृष्टीकोण अगदी प्राचीन काळातही मांडलेला दिसून येतो. इ.स. पूर्व पाचव्या शतकामध्ये हिपोक्रॅटस या शास्त्रज्ञाने मानवी डजीवन नैसर्गिक घटकांवर कसे अवलंबून आहे हे सांगितले. त्याच्या `On Airs, Wzters and Places' चा विवेचनामध्ये त्याने आशियातील व युरोपमधील मानवी जीवनांची तुलना केली. पर्वतमय प्रदेशात उंच, धिप्पाड व वीर पुरूष असतात तर सपाट प्रदेशात बुटके, आळशी, अकार्यक्षम लोक असतात. आशिया व युरोप यांच्या मध्यस्थ स्थान असलेल्या ग्रीक लोकांमध्ये दोन्ही प्रदेशांतील गुण आढळतात. या व अशा अनेक गोष्टी त्याने आपल्या विवेचनात मांडून मानवी जीवनावर निसर्गाचा कितपत व कसा परिणाम होतो हे सांगितले. याच प्रकारची उदाहरणे अँरिस्टॉट्लनेही सांगितली. त्याने नाईल नदीच्या ईजिप्तवर होणाऱ्या परिणामांची शास्त्रीय चिकित्सा केली. स्टॅबोच्या लिखाणामध्येसुद्धा निसर्गाचा मानवावर कसकसा परिणाम होतो हे दर्शविणारी तुलनात्मक उदाहरणे आढळून येतात. उदा, इटलींचा आकार, उंचसखलता, हवामान इ. घटकांचा रोमच्या उत्था- पनावर व शक्तीवर कसा परिणाम होत गेला याचे विवेचन. अशा तऱ्हेने प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी निसर्गवादामध्ये सामाविष्ट होऊ शकतील असे विचार त्या काळातील निरीक्षणाद्वारे मांडले. 19 व्या शतकामध्ये निसर्गावाद किंवा पर्यावरणवाद एक विशिष्ट वाद म्हणून प्रथम मांडला, तो रॅट्झेल (1844-1904) या शास्त्राने. अर्थात त्याच्या अगोदर आधुनिक भूगोलाचे आधारस्तंभ मानले जाणारे रिटर व बुम्बोल्ट यांनी पृथ्वीवरील अनेक घटकांचे `कार्यकारणसंबंध' अभ्यासले होते. अशा कार्य- कारणसंबंधाची मीमांसा करताना रॅट्झेलला नैसर्गिक घटकांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यातूनच पर्यावरणवादाची विचार- प्रणाली उदयास आली. भूगोलाचा विविध अंगी अभ्यास करणाऱ्या या जर्मन प्राध्यापकाने पर्यावरण मानवी जीवन कसे घडविते हे स्पष्ट केले. त्याने भूगोलाच्या अनेकविध शाखांचा अभ्यास केलेला असला तरी त्यात एक महत्त्वाचे सूत्र होते, ते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटकांचा मानवाशी असलेले संबंध पाहाणे हे होय. उदा, प्राकृतिक रचनेचा अभ्यास त्याच्या अगोदर अनेक शास्त्रज्ञांनी केलेला होता. परंतु रॅट्झेलच्या कार्याचे महत्त्व म्हणजे विविध प्राकृतिक रचना असलेल्या प्रदेशांत मानवी जीवनाची वैशिष्ट्ये त्याने अभ्यासली व मानवी घटनांचे संबंध उंची, उंचसखलता, हवामान, वनस्पति-जीवन यांसारख्या प्राकृतिक घटकांशी कसा आहे हे स्पष्ट केले. त्याच्या अँथ्रोपोजिओग्राफी ( भाग 1) या ग्रंथामध्ये त्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवीसमूहांचे वितरण नैसर्गिक शक्ती कशा प्रकारे नियंत्रित करतात हे सांगितले. अर्थात या ग्रंथामध्ये रिटरने सांगितलेलीच संकल्पना आपण नव्या शास्त्रीय पद्धतीनुसार विकसित केलेली आहे हे त्याने कबूल केले. रिटरपेक्षा रॅटझेल यांच्या विचारांमध्ये दोन मूलभूत फरक होते. एक म्हणजे, मानवी भूगोलाचा सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास करणे रॅट्झेलला जास्त सयुक्तिक वाटत होते, दुसरा डार्विनचा उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोणावर आधारित होता. रिटरच्या मते, मानव व निसर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत, परंतु रॅट्झेलने मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार आहे हा विचार मांडला डार्विनच्या सिद्धान्तानुसार उत्क्रांती घडत असतानाच निसर्गनिवडीच्या पर्यावरणाशी मानव जुळवून घेत घेतच विकसित होत असतो म्हणूनच मानव हा पर्यावरणाचा गुलाम आहे. पर्यावरणाच्या अनेकविध शक्तींनुसार तो घडत असतो. या शक्तींबरोबर योग्य अशी सांगड घातली तरच मानवाचे अस्तित्व अबाधित राहू शकेल. अशा तऱ्हेने मानवाची उत्क्रांती व त्यानुसार टिकून राहिलेले मानवी अस्तित्व सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आबे. रॅट््झेलच्या विचारप्रणालीचा हा भाग होय. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जीवशास्त्राचा झालेला विकास व डार्विनच्या सिद्धांतांना मिळालेली शास्त्रीय मान्यता यांचा भूगोलाच्या अभ्यासकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे पर्यावरणवादी दृष्टिकोणास विज्ञाननिष्ठता लाभली. याच काळात हेकेलने या सिद्धांतांचा अभ्यास करून Ecology हे नवीन शास्त्र सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने एकाच जागी राहाणाऱ्या अनेक सजीवांमधील परस्पर संबंध व पर्यावरणाशी असलेले नाते यांचा अभ्यास केला जातो. याच काळामध्ये समाज- शास्त्राचाही विकास बऱ्याच अंशी झालेला होता. मानवी समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा सांख्यिक अभ्यास मांडण्यास सुरूवात झालेली होती. त्यातूनच पर्यावरण- वादास पोषक असा एक सिध्दांत उदयास आला. तो म्हणजे "मानव त्याच्या प्रत्येक कृतीच्या बाबतीत मुक्त नसून तो पूर्णपणे नैसर्गिक आणि आर्थिक नियमांचा गुलाम आहे." अशा तऱ्हेने नवीन शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने हेकेलप्रमाणे इतर शास्त्रज्ञांनी विविध घटनांचा अभ्यास करून, मानव कृतिशील (Active) नसून अकृतिशील (passive ) आहे हे सिद्ध केले. बकल या शास्त्रज्ञाने इंग्लंडमधील सांस्कृतिक इतिहास (History of Civilization in England) या विषयावरील दोन ग्रंथांमध्ये पर्यावरणवादाचीच कास धरलेली आढळते. त्याच्या मते, मानवाच्या विविध क्रिया त्याच्या इच्छा- शक्तीनुसार होतात. परंतु हीच इच्छाशक्ती मुळात विशिष्ट नियमांवर अवलंबून असते. निसर्गातील विविध घडामोडींचा मानवी मनावर व मानवी मनाचा या घडामोंडीवर परिणाम होत असतो. अशा तऱ्हेने प्रत्येक मानवी घटना ही निसर्गा- मुळे बदलेले जाणारे मन व मानसिक क्रियांमुळे बदलला जाणारा निसर्ग यांच्या दृढसंबंधाचे द्योतक आहे. मानवी प्रगती किंवा अधोगती, सुख किंवा दुःख इ. या दुहेरी क्रियांचेच फळ मानावे लागेल. म्हणूनच सभोवताली एका विशिष्ट प्रकारची परिस्थिती जेथे जेथे आहे त्या प्रत्येक ठिकाणी मानवी विकसनामध्ये साम्य आढळते. हे साम्य उपलब्ध माहितीच्या व शास्त्रीय पद्धतींच्या साह्याने शोधून काढणे ही पर्यावरणवाद्यांची प्रमुख जबाबदारी होय. या प्रकारच्या सैद्धांतिक विवेचनानंतर बकलने मानवाच्या वांशिक गुणधर्मावर हवामान, अन्न, जमीन आणि निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोण या चार घटकांचा कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले. पहिले तीन घटक परस्परांवर परिणाम करून प्रामुख्याने संपत्तीचा संचय व वितरण यांच्याशी निगडीत आहेत. अर्थात प्रत्येक घटकाच्या परिणामांचे महत्त्व व प्रमाण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळे असते. उदा. आफ्रिका व आशिया- तील सांस्कृतिक विकासावर सुपीक जमिनींचा परिणाम जास्त महत्त्वाचा ठरतो, तर युरोपमध्ये हवामान हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. हवामानाचा मजुरीच्या दरांवर कसा परिणाम होतो हेही त्याने यात सांगितले. निसर्गाच्या सर्वसाधारण दृष्टिकोणामुळे सामाजिक मन घडत असते व त्यातूनच राष्ट्रीय मतप्रवाह निश्चित होतात म्हणूनच विकासाची एकूण दिशा ठरविण्याच्या दृष्टीने हा चौथा घटक अतिशय महत्त्वाचा आहे हे बकलने स्पष्ट केले. जेथे निसर्ग कमकुवत असतो तेथे मानवी मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व तो क्रियाशील बनवण्यास उद्युक्त होतो. याउलट जेथे निसर्ग अत्यंत सामर्थ्यशाली असतो तेथे मानव नैसर्गिक चमत्करांपुढे नतमस्तक होतो. त्यामुळे तो अंधश्रद्ध बनतो. आत्मविश्वासाचा अभाव असल्याने विकासाची गतीही कमी असते. यावरून हे स्पष्ट होते की, कोणत्याही प्रकारचे पर्यावरण असो, त्याचा मानवावर सतत वरचष्मा असतो. म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करताना जड विश्वाचा विचार करणे अटळ आहे. शेवटी निसर्ग-मानव एकमेकांवर परिणाम करतात हे मान्य करून बकल आवर्जून सांगतो की, मानव केव्हा व कसा क्रियाशील बनतो हे सर्वस्वी निसर्गाधीन आहे. 20 व्या शतकाच्या सुरूवातीस पर्यावरणवादाच्या विचारसणीमध्ये मौलिक भर टाकणारा शास्त्रज्ञ म्हणजे एडमंड डेमॉलिश हा होय. याने लेप्ले (1807 ते 1882 ) या तज्ज्ञाने सांगितलेले विचार विकसित कले. लेप्लेने पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यासाठी जागा, कार्य व समूह असे सूत्र सांगितले. जागा म्हणजे पर्यावरण, कार्य म्हणजे मानवी कार्य आणि समूह म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकसनानुसार अस्तित्वात असलेला मानवी समाज होय. या सूत्राचा विचार करून डेमॉलिन्सने पर्यावरणातील अनेक शक्तींच्या अभ्यासावर लक्ष केद्रित केले. त्याच्या ग्रंथामध्ये त्याने विविध मानवी समूहांचे स्थलांतराचे मार्ग कसे निर्माण झाले हे स्पष्ट केले. त्याच्या मते, स्थलांतराचे मार्ग म्हणजे केवळ स्थलांतर कोणत्या प्रदेशातून मार्गक्रमण करते हे नसून कालांतराने मानवी समूह आपणास योग्य अशी जागा कोणती निवडतात याचाही विचार ध्यानात घेतला पाहिजे. ज्या विविध मार्गानी आपले पूर्वज भटकत होते त्यानुसार आजच्या स्कॅन्डेनेव्हियन,जर्मन, ग्रीक इटालीयन, स्पॅनिश इ. प्रदेशांतील लोकांमध्ये विविधता आढळते. याच्याही पुढे जाऊन तो म्हणतो, "जर पृथ्वीचा पृष्ठभाग बदलला गेला नाही आणि त्यवर मानवी इतिहास पुनश्च घडण्यास सुरूवात झाली तर त्या इतिहासाची पुनरावृत्तीच होईल" यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागा- वरील घटकांना डेमॉलिन्सच्या दृष्टीने किती महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट होते. त्याने आपल्या विचारांना पुष्टी देणारी अनेक उदाहरणे सांगितली. स्टेप प्रकारचे हवामान गवत निर्माण करते. या गवताळी प्रदेशामध्ये एका विशिष्ट प्रकारचे मानवी जीवन आढळून येते. गवतावर आधारित घोड्यांची पैदास व घोड्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य असलेले मानवी जीवन तेथे दिसून येते. मानवाचा आहार प्राणिजीवनावर अवलंबून असतो. हे प्राणिजीवन पर्यावरणावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे मानव ज्या वस्तूंचे उत्पादन करतो त्या वस्तूंचा कच्चा माल ही निसर्गाचीच देणगी आहे. अशा तऱ्हेने मानवाच्या आहार-विहारावर निसर्गाचे प्रभुत्व आहे. निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी विचारसणीच्या विकसनातील शेवटचा टप्पा म्हणजे एलन सेंपल या बिदूषीचे कार्य होय. तिने 1911 मध्ये `भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम' हा ग्रंथ सादर केला. रॅट्झेलची विद्यार्थिनी असल्याने तिने त्याच्या विचारांचीच कास धरली. अर्थात शास्त्रीय प्रगतीनुसार रॅट्झेलच्या कल्पनां- मध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता तिने मान्य केली. मानवाची संपूर्ण जडण- घडण सर्वस्वी निसर्गानुसार होत असते." ही तिच्या विवेचनातील मध्यवर्ती कल्पना होय. अगदी टोकाची भूमिका घेताना मानवास लाभलेली बुद्धी, स्फूर्ती आणि कार्यक्षमता नैसर्गिक घटकांवरच अवलंबून असते असे तिने आवर्जून सांगितले. तिच्याच शब्दांत सांगायचे तर "मानव हा पृथ्वीच्याच धूलिकणांतील एक कण आहे (dust of her dust) " असे म्हणावे लागेल. पृथ्वीने मानवाला जन्म देऊन त्याचे पालनपोषण केले. एवढेच नव्हे तर पृथ्वीनेच मानवनापुढे जलसिंचन किंवा जलवाहतूक यासारखे प्रश्न निर्माण केले आणि पृथ्वीनेच त्यांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टिने मानवास सामर्थ्य व बुद्धी बहाल केली. पर्वतमय प्रदेशात तिने मानवास डोंगर चढण्यासाठी जसे जास्त शक्तिशाली पाय व स्नायू दिले तसे किनारपट्टीच्या प्रदेशात त्यास होडी चालविण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. तेव्हा मानवाचे विविध प्रकारचे सामर्थ्यसुद्धा निसर्गाची देणगी आहे. एखाद्या साच्यातून जशी प्लॅस्टिकची खेळणी तयार केली जातात त्याप्रमाणे विविध नैसर्गिक प्रदेशांतून विविध प्रकारचे मानवी समूह तयार केले गेले आहेत. अशा प्रकारे निसर्गवाद आवर्जून सांगणाऱ्या या विदूषीने धर्म धार्मिक, कल्पना व रूढी यांवरही निसर्गाचा परिणाम कसा होतो ते स्पष्ट केले. पर्यावरणाच्या घटकांचे हे मानस- शास्त्रीय परिणाम किरशॉफ (Kirchoff) या रॅट्झेलच्याच विद्यार्थ्यानेही सांगितलेले आहेत.
0 टिप्पण्या